Corona Test Guidelines : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार रोज नवनवीन पावलं उचलत आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.
त्यानुसार आता संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. फक्त अशा लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जे वयोवृद्ध आहेत किंवा त्यांना गंभीर आजार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर नवीन चाचणी धोरण तयार करण्यात आलं आहे. ICMR ने असा सल्ला दिला आहे की आंतरराज्य प्रवास करणाऱ्या व्यक्तींना देखील कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. चाचणीसाठी RT-PCR, TrueNat, CBNAAT, Crisper, RT-LAMP, रॅपिड मॉलेक्युलर टेस्टिंग सिस्टीम किंवा रॅपिड अँटीजेन टेस्टचा वापर करावा, असे सांगण्यात आलं आहे.
राज्यात आज रुग्णसंख्येत घट
मुंबईसह आज राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांत काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात ३३ हजार ४७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत जवळपास १० हजारांनी घट झाली आहे. रविवारी राज्यात 44 हजार 388 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.