मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील नाट्यमय घडामोडीनंतर मंगळवारी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून NCB रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. यानंतर रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान मौन बाळगलेल्या बॉलीवूड कलाकारांनी आता मात्र रियाच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. विद्या बालन, अनुराग कश्यप, राधिका आपटे, हुमा कुरेशी, श्वेता बच्चन फरहान अख्तर या सगळ्यांना रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. य़ा सगळ्यांकडून एक मेसेज ट्विट करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती हिने परिधान केलेल्या टी-शर्टवरही हा मेसेज लिहण्यात आला होता. यामध्ये समाजातील पितृसत्ताक पद्धतीचे वर्चस्व झुगारून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मागणीला मराठी चित्रपटसृष्टीतील मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, समीर विद्वांस यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता बॉलीवूड खऱ्या अर्थाने रियाच्या बचावासाठी सरसावल्याचे दिसत आहे.
रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूत याची प्रेयसी होती. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा तर्क मांडण्यात आल्यानंतर संशयाची सुई सर्वप्रथम रिया चक्रवर्ती हिच्याकडे वळली होती. रियाने सुशांतकडून पैसे उकळले, यानंतर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे अनेक प्रवाद पुढे आले होते. मात्र, या सगळ्याचे ड्रग्ज पेडलरशी धागेदोरे असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले होते.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून NCBकडून रिया चक्रवर्ती हिची चौकशी सुरु होती. यादरम्यान तिने आपण सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली होती. मात्र, आपण ड्रग्जचे सेवन करत नसल्याचेही रियाने स्पष्ट केले होते. मात्र, NCBकडून रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर रियाचे वकील सतिश मानशिंदे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. रियाला अटक करणे म्हणजे न्यायदेवतेची क्रूर थट्टा आहे. एका अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे देशातील तीन केंद्रीय यंत्रणा एकट्या स्त्रीच्या पाठिशी लागल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत हा अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. ड्रग्ज आणि प्रतिबंधित औषधांचे सेवन केल्यामुळे त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली, असे सतिश मानेशिंदे यांनी सांगितले.