मुंबई : Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा एकदा रात्रीचे आगीचे तांडव पाहायला मिळाले. कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरातील फर्निचर मार्केटच्या गोदामाला मध्यरात्री मोठी आग लागली. या आगीत गोदामातील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले आहेत. गीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगीवर नियंत्रणात आणण्यात यश आले. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. (Furniture warehouse fire in Bhiwandi)
फर्निचर गोदामाला लागलेल्या भीषण आगी इतकी मोठी होती की, जवळीत अन्य दोन फर्निचर गोदामांना आग लागली. त्यामुळे पुन्हा आग भडकली. लागलेल्या या आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक झाली. गोदामाला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी भिवंडी अग्निशमन दल आणि ठाणे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
आग लागलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर फर्निचर तयार करणारे मशीन आणि लाकडी साहित्य, लाकूड होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोदामाला आग लागल्याची माहिती समजताच स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आला. मात्र, वाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला.
ज्या ठिकाणी आग लागली तो परिसर हा फर्निचर बाजाराचा आहे. त्यामुळे आगीवर सुरुवातीला नियंत्रण मिळवण्यास अपयश आले असते तर अन्य दुकाने, गोदामे आगीत जळून खाक झाली असती. भिवंडीमध्ये आग लागण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.