मुंबई : १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच शनिवारपासून गणेशोत्सवाच्या Ganeshotsav 2020 मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजे coronavirus कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.
मागील बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांनीच आता मोठ्या मनोभावे आपआपल्या घरात, काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रींची प्रतिष्ठातपना केली आहे. तर, काहींनी मनोभावे या गणरायाला साकडं घालत 'बा गजानना हे संकट दूर कर', अशी विनवणी केली आहे.
संपूर्ण देशात आणि अर्थातच परदेशातही अतिशय मंगलमय अशा या पर्वाची सुरुवात झाली आहे. असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या श्री सिद्धीविनायक मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाची आरती करण्यात आली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं या क्षणांचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाला सुरेख अशा चाफ्याच्या सुवासिक फुलांचा साज चढवल्याचं पाहायला मिळत आहे. चाफ्याची कंठी आणि विलोभनीय असं गणरायाचं रुप सारी संकटं दूर करण्यासाठीच जणू सज्ज झालं आहे हे या मंगलमूर्तीकडे पाहयताना जाणवत आहे.
#WATCH Maharashtra: 'Aarti' being performed at the Shri Siddhivinayak Temple in Mumbai on #GaneshChaturthi. pic.twitter.com/5LBmeX0Ij4
— ANI (@ANI) August 22, 2020
गणेशोत्सवाच्या पर्वाला सुरुवात झाल्यामुळं मागील काही काळापासून असणाऱं कोरोनाचं सावट आणि नकारात्मक वातावरण काहीसं दूर राहून सर्वत्र आनंददायी माहोल पाहायला मिळेल अशीच आशा सर्वजण मनी बाळगून आहेत.
सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचं संकट दूर करण्यासाठीचे प्रयत्न सुरु ठेवत यंदाच्या वर्षी या बाप्पांचं आगमन झालं आहे, तेव्हा आता हे वैश्विक महामारीचं संकटही बाप्पा दूर करेल याच मनोकामनेसह सर्वांना 'झी २४तास'कडून गणेश चतुर्थीच्या या मंगलमय पर्वाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.