दीपक भातुसेसह, गजानन देशमुख, झी मीडिया, मुंबई,परभणी : शेतकऱ्यांच्या नावे परस्पर ३२८ कोटी रुपये पिक कर्ज उचलणाऱ्या गंगाखेड शुगर एन्ड एनर्जीविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या या कारखान्याने जिवंत तर सोडाच मृत शेतकऱ्यांच्या नावेही कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती झी मिडियाच्या हाती आली आहे. गुट्टे यांनी शेतकऱ्यांना कसे लुटले आहे त्याचा हा पर्दाफाश...
परभणी जिल्ह्यातील वाघदेवाडीच्या या सीमिता नागरगोजे...यांच्या नावे सोनपेठ तालुक्यातील दिवठाना येथे साडेचार एकर शेती आहे. पती मुरलीधर नागरगोजे यांच्यासाठी गाडी विकत घ्यायची म्हणून सीमिता यांना आपल्या सातबारावर कर्ज काढायचे होते. कर्ज काढायला त्या आपल्या पतीसह गंगाखेड इथल्या ग्रामीण बँकेत पोहचल्या. मात्र तुमच्या नावावर नागपूर इथल्या आंध्रा बँकेचं 1 लाख 97 हजार रुपयांचं कर्ज असल्याचं सांगत ग्रामीण बँकेने त्यांना कर्ज नाकारलं. नागपूर इथल्या आंध्रा बँकेचं तोंडही न बघितलेल्या आणि कधीच पिक कर्ज न घेतलेल्या सीमिता यांना आणि त्यांच्या पतीला यामुळे धक्काच बसला.
नागरगोजे यांनी यानंतर थेट नागपूरची आंध्रा बँक गाठली, बँक प्रशासनाशी बराच वाद घातल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावावरचं कर्ज हे रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अण्ड एनर्जी लिमिटेडने घेतल्याचं त्यांना समजलं.
जिवंत शेतकरी सोडाच, मृतांच्या टाळूवरचे लोणी ख्यायलाही गंगाखेड साखर कारखान्याने कमी केलं नाही. गंगाखेड शहरात कापड दुकान चालवणाऱ्या ज्ञानेश्वर चिंतामण गुंडाळे आणि बालाजी चिंतामण गुंडाळे यांच्या वडिलांचा मृत्यू 19 डिसेंबर 2014 रोजी झाला. मात्र मृत चिंतामण गुंडाळे यांच्या नावे 2015 साली गंगाखेड साखर कारखान्याने 1 लाख 85 हजारांचे पिक कर्ज काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
असाच प्रकार पूर्णा जिल्ह्यातील कावलगाव येथील मृत केशवराव त्र्यंबकराव धवन यांच्याबाबतीत घडला. 3 डिसेंबर 2014 रोजी एका अपघातात धवन यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या नावे मृत्यूनंतर 2015 साली गंगाखेड कारखान्याने 2 लाख 60 हजार रुपयाचे पिक कर्ज काढलं आहे.
अशा प्रकारे आपल्या नावावर अथवा मृत नातेवाईकांच्या नावावर परस्पर रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याने कर्ज उचललेल्याचे इतर शेतकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागले. यातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मग उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. गंगाखेड शुगर एण्ड एनर्जी लिमिटेडने अशा प्रकारे 8 हजार शेतकर्यांची फसवणूक केली असून त्यांच्या नावे 328 कोटी रुपयांचे कर्ज परस्पर उचलल्याचा दावा याचिकेत केला आहे.
जे शेतकरी गंगाखेड साखर कारखान्याचे सभासद आहेत त्यांच्या नावाने अशाप्रकारे परस्पर कर्ज उचलण्यात आलं आहे. गंगाखेड कारखान्याला शेतकरी ऊस घालायचे तेव्हा कारखान्याचे शेतकी अधिकारी त्यांचा सात बारा जमा करून घ्यायचे. त्याचाच वापर अशाप्रकारे कर्ज उचलण्यासाठी करण्यात आला आहे. या फसवणुकीची व्याप्ती उस्मानाबाद बीड जालना नांदेड हिंगोली परभणी आणि यवतमाळ या 7 जिल्हयात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
काबाड कष्ट करून शेतात राबणार्या शेतकर्यांना राष्ट्रीयकृत बँका सहसा पिक कर्ज द्यायेला उभंही करत नाहीत. मात्र गंगाखेड इथल्या शेतकऱ्याच्या नावे एक साखऱ कारखाना थेट नागपूर इथल्या बँकेतून कर्ज उचलतो. आंधळं दळतंय आणि कुत्र पिठ खातंय असा हा प्रकार आहे. ही बाब समोर आली नसती तर शेतकऱ्यांच्या नावे पिक उचलणाऱ्या गंगाखेड साखर कारखान्याला कोट्यवधी रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळाला असता.