मुंबई : पुढील तीन दिवसात राज्यातल्या विविध भागास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय. मात्र २१ जुलैनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळं शेतक-यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही.
हवामान खात्यातनं मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत 24 तासात मुंबई शहरात 31.64 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 49.47 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 27.25 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी दिवसभराच्या विश्रांती नंतर रायगड जिल्हयात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्हयाच्या अनेक भागात रात्रभर पावासाच्या सरी कोसळत होत्या. आज सकाळपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी कर्जत खालापूर भागात संततधार सुरू आहे.
इतर भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आभाळ ढगांनी आच्छालेले आहे. तर पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे . वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामुळे नागरीक हैराण आहेत.
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यातील बहुतांशी भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळालाय. गेल्या दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यातील या दोन तालुक्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावलीय.
मात्र, जिल्ह्यातील जालना,परतूर,अंबड,घनसावंगी,मंठा आणि बदनापूर तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं या ६ तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 196.49 मिलीमीटर पाऊस झालाय. यापैकी सर्वाधिक पाऊस भोकरदन तालुक्यात झालाय.
गेले काही दिवस झालेल्या दमदार पावसाने पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. धरणांचा पाणीसाठी झपाट्याने वाढत आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण चोवीस धरणांमधीलल पातळी वेगाने वाढत असून शहराची तहान भागविणारे गंगापुर ७५ टक्के आणी दारणा धरण ७८ टक्के भरले आहे. नवीन झालेले भावली धरण ८३ टक्के भरलेय.
जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण गीरणाची पातळी २६ टक्के आहे गेल्या वर्षी या धरणातील पातळी केवळ २ टक्के होती. जिल्ह्यातील मोठे प्रकल्प सात आणि मध्यम १७ प्रकल्प मिळून २४ धरणात जलसाठ्याची सरसरी ४१ टक्क्यावर पोहोचली आहे. एकूणच परिस्थिती समाधानकारक असून मराठवाड्यालाही पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही प्रमुख धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने गोदावरी खळखळाळून वाहत असल्याने जायकवाडीची तहान वेळेस भागणार आहे.