तर राणा दाम्पत्यावर कारवाई होणार, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

राणा दाम्पत्य हे पुढे केलेलं प्यादं, पाहा राष्ट्रपती राजवटीवर काय बोलले गृहमंत्री  

Updated: Apr 23, 2022, 07:27 PM IST
तर राणा दाम्पत्यावर कारवाई होणार, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं  title=

मुंबई : सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. असे  राज्यात कधीच झालं नव्हतं असा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या प्रश्नांना उतर दिलं आहे. 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. पण काही लोक यासंदर्भात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राज्यात राहिली नाही अशा प्रकारे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. एखाद्या ठिकाणी अशाप्रकारची घटना घडली की लगेच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली अशा प्रकारच्या निष्कर्श लावणं उचीत नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे, त्यांचा हेतूच तो आहे,  काहीतरी वातावरण तयार करायचं, त्रिपूरात एखादी घटना घडली की इथे काही तरी घडवून आणायचं, दंगली घडवायच्या, भोंग्यावरुन दोन समाजात अस्वस्थता निर्माण करायची. कोणाला हनुमान चालिसा वाचायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरी वाचावी, अमरावतीच्या घरी वाचावी, मुंबईच्या घरी वाचावी किंवा दिल्लीच्या घरी वाचावी, याच ठिकाणी वाचवण्याचा हट्ट कशाला असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला आहे.

कोरोनाच्या काळातही मंदिर सुरु करण्याचा हट्ट करुन विरोधी पक्षाकडून दाखवण्याचा प्रयत्न होतोय की या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करा, पण ते इतंक सोप नाही.

तर कारवाई होणार 
राणा दाम्पत्याच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, पण गृहमंत्री, मुख्यमंत्री किंवा कोणीही कोणत्याही वेगळ्या सूचना देत नाही. पोलीस आयुक्तांनी निर्णय घेऊन कारवाई करायची असते त्या पद्धतीने ते कारवाई करत आहेत, पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही ते हट्ट करणार असतील तर कायद्याप्रमाणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

जबाबदार लोकप्रतिनिधींनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करायला हवं, आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा क्षोभ वाढणार नाही, तेढ वाढणार नाही, अशा प्रकारची वर्तणूक असायसा पाहिजे, पण  अशी वर्तणूक न ठेवता, विनाकारण पब्लिस्टी करायची. हे पुढे केलेलं प्यादा आहे. यातून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, हा जाणीवपूर्वक प्लान आहे असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

सर्वपक्षीय बैठक
२५ तारखेला सर्वपक्षीय बैठक होईल प्रत्येक पक्षातील दोनदोन प्रतिनिधींना बोलावलं जाईल, भोंग्यासंदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या संदर्भात नक्की काय भूमिका राज्यात घ्यायची यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलावलं आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. तर पंतप्रधानांचा दौऱ्यासाठी पोलीस आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत. पंतप्रधानांचा दौरा निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वासही गृहमंत्र्यांनी दाखवला.