Worli bandh called today : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय. (Maharashtra Political News) शिंदे फडणवीस सरकार महापुरूषांचा अपमान करत असल्याचा आरोप करत वरळी बंद पुकारण्यात आलाय. आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वरळीत कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते सुधांशु त्रिवेदी, प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार आज वरळीत बंद असणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सध्या वरळीतील नागरिकांकडून बंदचे पोस्टर लावले जात असल्याची माहिती समोर येत आहे. आज 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ मुंबईच्या वरळी परिसरातही बंदची हाक देण्यात आली आहे.
या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणते आदेश काढले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच वरळी हा भाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या वरळी बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन झाल्यास आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याच्या अनेक भागात आंदोलने केली जात आहेत. मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यपालांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात पुण्यात बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार पुण्यातील बाजारपेठेसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.