'राज्यातील मंदिर मशिदींच्या इनाम जमिनी अधिकाऱ्यांनी हडपल्या'; सत्तेतील मंत्र्यानेच केला खळबळजनक दावा

 राज्यातील मंदिर, मशिद आणि काही दर्गा यांच्या इनाम जमिनी अधिकाऱ्यांनी संगनमताने हडपल्याचा धक्कादायक आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे.

Updated: Dec 21, 2021, 01:12 PM IST
'राज्यातील मंदिर मशिदींच्या इनाम जमिनी अधिकाऱ्यांनी हडपल्या'; सत्तेतील मंत्र्यानेच केला खळबळजनक दावा title=
representative image

मुंबई : राज्यातील मंदिर, मशिद आणि काही दर्गा यांच्या इनाम जमिनी अधिकाऱ्यांनी संगनमताने हडपल्याचा धक्कादायक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आष्टीमध्ये तीन दर्गा आणि मशीदीच्या जागेवर इनाम जमिनीत फेरफार करून अधिकार्‍यांनी इमान खालसा केले आणि जमिनीचे प्लॉट करून त्याची विक्री अधिकारी करत होते. असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला.

आमच्या कार्यकर्त्याने 10 देवस्थानाच्या जमिनीत फेरफार केल्याचं समोर आणलं आहे. यात मशिद, दर्गा आणि मंदिरांच्या जमिनींचा समावेश आहे. मंदिरांच्या जमिनींचेही इमान खालसा केल्याचे समोर आले आहे.असा धक्कादायक दावा मलिक यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मंदिर, दर्गा, मशिद मिळून एकूण 513 एकर जमिनींचे इनाम खालसा केले आहे. हा प्रकार 2017 पासून सुरू झालाय. तेव्हा उप जिल्हाधिकारी एन आर शेळके होते. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले

त्यानंतर प्रकाश आघाव उपजिल्हाधिकारी आले त्यांनीही तेच केले. याप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार झाली, त्यांनी एसआयटीची नियुक्ती केली आहे.

भाजप नेत्यांचा संबध

7 मंदिरांबाबत राम खाडे यांनी तक्रार केली आहे.  गृहविभाग आणि ईडीकडेही याची तक्रार केली आहे. मच्छिंद्र को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचा यात सहभाग आहे. यात दोन नेत्यांची नावं ईडीच्या तक्रारीत आहे.

एक भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचेही नाव आहे. 
 
जो भाजप रामाच्या नावाने राजकारण करतो, त्या पक्षाचे नेते श्रीराम, विठ्ठलाच्या देवस्थानाच्या जागा हडपतायत. जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. यात गृहविभागाने तक्रार करून कारवाई करावी.  अशी मागणीही मलिक यांनी केली.