Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात (chhatrapati shivaji maharaj hospital) उपचाराअभावी गुरुवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एका रुग्णाचा मृत्यू रविवारी झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांना रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे मृत रुग्ण हे शेवटच्या क्षणी दाखल केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा प्रशासनानं केला आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सर्वपक्षीय नेत्यांना रुग्णालयात धाव घेतली. मनसे नेते अविनाश जाधव, ठाकरे गटाचे नेते केदार दिघे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे.
याची जबाबदारी कोण स्विकारणार - जितेंद्र आव्हाड
"बेशरम प्रशासन आहे. आजसुद्धा रुग्णालयामध्ये परिचारिका, डॉक्टर कमी आहेत. याची जबाबदारी कोणी स्विकारणार आहे की नाही. का गरीब लोक फक्त मरायला जन्माला येतात. ठाणे प्रशासना जाग येतच नाही. त्यांना फक्त रंगरंगोटी, लाईट करण्याचं काम झालं. त्यात 400-500 कोटी रुपये घातले असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महिनाभरात त्या लाईट्स बंद पडल्या तरी चालतील, त्यांची बिलं काढली की यांचं काम झालं, असंही ते म्हणाले. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत हे आमचं भाग्य आहे, ठाण्याला एवढं मोठं पद मिळतं आणि प्रतिष्ठेचा माणूस मिळाला आहे, पण हृदयाच थोडं ममत्व, थोडी माया, गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी असायला हवी," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कळवा रुग्णालयात डॉक्टर लक्ष देत नाहीत - अविनाश जाधव
"कळवा रुग्णालयात आजच्या घडीला मृत्यूचा तांडव सुरू आहे. या तांडवाला प्रशासन आणि आयुक्त जबाबदार आहेत. ज्या पद्धतीने रुग्ण मरतात, हे सांगतात की रुग्ण अतिगंभीर झाल्यावर दाखल होतात. काल एक महिला रुग्ण चालत रुग्णालयात आली आणि आज गंभीर झाली. याचा अर्थ कळवा रुग्णालयात डॉक्टर लक्ष देत नाहीत. म्हणूनच रुग्ण मरत आहेत. आणि हे येथे मरायला सोडलेले आहेत. हे मृत्यूचं तांडव थांबलं पाहिजे. नाहीतर ठाण्यात सर्व प्रशासनाला भोगावं लागेल हे नक्की," असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
"सिव्हील रुग्णालय बंद पडल्याने या रग्णालयावर लोड आला आहे. पण पावसाळा आहे, रुग्ण येणार, याची तयारी व्हायला हवी होती. हे दरवर्षीचं आहे. ज्या गोष्टींची गरज आहे, त्या सुविधा देता येत नाहीत. कळवा रुग्णालयात येणारे रुग्ण कोण आहेत? रिक्षा चालवणारे, टॅक्सी चालवणारे, भांडी घासणारे. त्यांनाच उपचार करू शकला नाहीत तर उपयोग काय, उद्या आयुक्तांना आम्ही जाब विचारणार आहोत," असेही अविनाश जाधव म्हणाले.
ज्याच्यामुळे हे घडलं त्याच्यावर उचित कारवाई केली जाईल - आरोग्यमंत्री तानाजी सावंत
या सगळ्या प्रकारानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माध्यमांसोबत बोलताना याबाबत भाष्य केले आहे. "गुरुवारी ज्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्याबाबतचा अहवाल दोन दिवसात येणार आहे. त्यानंतर आता 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माझ्या अखत्यारित जे रुग्णालय आहे त्याचे शिफ्टिंग झाले आहे. त्यातील एकही रुग्ण या रुग्णालयात आलेला नाही. माझ्या सेवा सुरळीत चालू आहेत. या रुग्णालयात काय झालं याचा अहवाल आल्यावरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल. पण जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड होणे हे माझ्यासारखा संवदेनशील आरोग्यमंत्री सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यावर कारवाई करण्यात येईल. हे सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रथम कर्तव्य महाराष्ट्र शासनाचे आहे. ज्याच्यामुळे हे घडलं त्याच्यावर उचित कारवाई केली जाईल," असा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिला आहे.