कल्याण : रेल्वे मार्गाने होणारी अवैध सामानाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग अलर्टवर आहेत. रेल्वेच्या आरपीएफ आणि सीआयबी अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे. हैद्राबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांना मिळाली होती. आरपीएफ आणि सीआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्स्प्रेस मधून पाच संशयित इसमाना ताब्यात घेतलं.
या 5 जणांकडून 1 कोटी 1 लाख 55 हजार रुपयाची रोकड तसंच 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. गणेश मरिबा भगत , मयूर वालदास भाई कापडी , नंदकुमार वैध , संजय मनिककामे , चंदू माकणे अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत.
आरोपींनी आपण कुरियर कंपनीसाठी काम करत असून कुरियर पोचवण्यासाठी आल्याची माहिती दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याची तस्करी मागच्या रहस्याचा पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध सुरु आहे.
काल बुधवार 25 मे रोजी नांदेड कडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस मधून कोट्यावधी रुपयाच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफ स्टाफला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले, यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला होता.
आरपीएफचे निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांनी तीन वेगवेगळ्या बोगी मध्ये 5 जन संशयितरित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले . या पाच जणांना सामाना सह ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेतली असता एकाच पार्सल मध्ये 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं असलेले 3 बॉक्स तर इतर चौघांच्या पार्सल मध्ये मिळून 1 कोटी 1 लाख 55 हजार रुपयाची रोकड असल्याचं आढळून आलं.
या पाचही जणांनी आपण वेगवेगळ्या कुरियर कंपन्यासाठी नांदेड, औरंगाबाद, परभणी मध्ये काम करत असून मस्जिद बंदर मधील संबधित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोचवण्याचे काम देण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले असून रेल्वेच्या आरपीएफ विभागाने हि रोकड आणि सोने ताब्यात घेत जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्राकडून देण्यात आली.