मुंबई : मुंबईत सध्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर जाऊन (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान) हनुमान चालीसाचं पठण करणारच, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी केला आहे. तर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावंच, असं प्रतिआव्हान शिवसेनेने दिलं आहे. (know who is amravati lok sabha constituency mp navneet rana who give challenge to cm uddhav thackeray over to hanuman chalisa)
या हनुमान चालिसाच्या निमित्ताने नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नवनीत राणा कोण आहेत, त्यांच्या इथवरचा आतावरचा प्रवास कसा राहिला आहे, हे आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत.
नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2019 साली खासदार म्हणून निवडून गेल्या. त्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या खासदार आहेत.
नवनीत यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पंजाबी आणि दक्षिण भारतीय सिनेमात काम केलंय. राजकारणात येण्याआधी नवनीत या अभिनेत्री होत्या, हे काही मोजक्यांनाच माहिती आहे.
नवनीत यांनी 12 वी पास झाल्यानंतर मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी एकूण 6 अलब्मसाठी काम केलं. कौर यांनी आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली. नवनीत यांचे आई-वडील हे मुळचे पंजाबचे. त्यांचे वडील आर्मीत ऑफिसर होते.
कौर यांनी तेलुगु भाषेतील 'दर्शन' या सिनेमातून पदार्पण केलं. या शिवाय त्यांनी तेलुगु सिनेमा सीनू, वसंथी आणि लक्ष्मी या सिनेमातही अभिनय केलंय.
तसेच कौर यांनी तेलुगु सिनेमा चेतना, जग्पथी, गूड बॉय आणि भूमा यासारख्या सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप सोडली.
इतकंच नाही, तर नवनीत यांनी मल्यालम सिनेमा 'लव इन सिंगापूर' शिवाय पंजाबी सिनेमा 'लड गये पेंच' या सिनेमातही जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
नवनीत राणा यांना योगामध्ये विशेष आवड होती. त्या बाबा रामदेव यांच्या भक्त होत्या. नवनीत बाबा रामदेवा यांना वडिलांसारखं मानतात.
नवनीत आणि रवी राणा या दोघांची लव स्टोरी ही फिल्मी स्टोरीपेक्षा भारी आहे. या दोघांची पहिली भेट ही योगगुरु रामदेव बाबा यांच्या योगा कॅम्पमध्ये झाली. इथेच या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतंर मैत्रीत झालं. त्यानंतर या दोघांनी नातं पुढं नेण्यासाठी रामदेव यांची परवानगी घेतली आणि पुढचं पाउल टाकलं.
नवनीत आणि रवी राणा या दोघांचं सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न संपन्न झालं. दोघांनी 2 फेब्रुवारी 2011 मध्ये सप्तपदी घेतल्या. या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 3 हजार 162 जोडप्यांनी नव्या इनिंगला सुरुवात केली.
या दोघांच्या लग्नाला त्यावेळेस त्तकालिन मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण, योग गुरु बाबा रामदेव, सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो राव आणि अभिनेता विवेक ओबेरॉय उपस्थित होते. नवनीत यांनी मात्र लग्नानंतर सिनेसृष्टीपासून फारकत घेतली.
नवनीत यांनी सिनेसृष्टीत बऱ्यापैकी आपलं स्थान निर्माण केलं होतं. आपल्या अभिनयाने त्यांनी ठसा उमटवला होता. यानंतरही त्यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
त्याचं झालं असं की, नवनीत यांचं लग्न झालं तेव्हा रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. मात्र त्यांचा पराभव झाला.
पण यानंतर नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार केला. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. या मतदारसंघातून 1999 पासून शिवसेनेचाच खासदार निवडून यायचा. मात्र नवनीत राणा यांनी 2019 मध्ये सेनेच्या या गडाला सुरुंग लावला आणि विजयी झाल्या. त्यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.