Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघात आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही राज्यातील मतदार संघांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवर अंतर्गत वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर मतदार संघासाठी चंद्रकांत खैरे यांचे नाव जवळपास निश्चित होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात मातोश्रीवर उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार म्हणून अंबादास दानवेसुद्धा इच्छुक आहेत. मात्र असे असतानासुद्धा दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी निश्चित केल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंसमवेत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती.
मात्र त्यानंतर सुद्धा अंबादास दानवे हे नाराज असल्याचे बोलले जातंय. दानवे हे मुंबई विमानतळावरुन संभाजीनगरला जाण्यासाठी निघाले होते. यानंतर पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना मातोश्रीवर बोलवून घेतले आहे. पक्षामध्ये नेतेपद दिले नसल्यानेही अंबादास दानवे नाराज होते.त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी आपली नाराजी आज बोलून दाखवल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यात आज चर्चा झाली. तसेच चंद्रकांत खैरेसुद्धा आज मातोश्रीवर होते. त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांची नाराजी उद्धव ठाकरे दूर करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. देशात एकीकडे 'एक देश, एक निवडणूक' चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल याची उत्सुकता आहे. दरम्यान त्याआधी Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. महाराष्ट्रात जर आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली तर नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून समोर आला आहे. ओपिनियन पोलनुसार जर महाराष्ट्रात आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार आणि अन्य यांना 48 पैकी 45 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यासह इतर पक्ष आहेत.