Loksabha 2024 : महायुतीचं जागावाटप आज जाहीर होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. आजऐवजी उद्या म्हणजे शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेवून जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अजूनही काही जागांवरुन महायुतीत (Mahayuti) तिढा असल्यानं जागावाटप रखडलंय. नाशिक, रत्नागिरी-सिँधुदुर्ग, हातकणंगले, ठाणे या जागांचा निर्णय झाला नसल्यानं जागावाटपाची घोषणा लांबणीवर पडल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
शिवसेनेची संभाव्य यादी (Shivsena Shinde Group List)
दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. यानुसार
1. रामटेक - राजू पारवे
2. बुलढाणा - संजय जाधव
3.यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
4. हिंगोली - हेमंत पाटील
5. कोल्हापूर - संजय मंडलिक
6. हातकंणगले - धैर्यशील माने
7. मावळ - आप्पा बारणे
8. शिर्डी - सदाशिव लोखंडे
9 . पालघर - राजेद्र गावित
10. कल्याण - श्रीकांत शिंदे
11. दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
रायगडमध्ये महायुतीत धुसफूस
रायगडमध्ये महायुतीत अजूनही धुसफूस सुरूच आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रायगडमधील महायुतीच्या आमदारांची समजूत काढण्यासाठी काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र, भाजपनंच रायगडमधून लढावं या मागणीवर भाजप पदाधिकारी ठाम आहेत. शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटीलही नाराज असल्याचं समजतंय. भाजप पदाधिकारी धैर्यशील पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणारेत. धैर्यशील पाटील यांना रायगडमधून उमेदवारी देण्याची मागणी भाजप पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यताय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अखेर भाजपच्या पारड्यात पडल्याचं समजतंय. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. कालच मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाली होती. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र आज नारायण राणेंचं नाव समोर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर राणेंना उमेदवारी मिळाल्यास विनायक राऊतांशी सामना होणार आहे.
माढाचा तिढा कायम
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपातला अंतर्गत वाद काही शमायला तयार नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक-निंबाळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिलीय. धैर्यशील मोहिते-पाटलांना मविआकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
शिवतारेंची तलवार म्यान?
दरम्यान, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. विजय शिवतारेंच्या तक्रारींचं समाधान करण्यात यश आल्याची माहिती मिळतेय. पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून लढण्याची घोषणा शिवतारेंनी केली होती. मात्र शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी शिवतारेंसोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. शिवतारेंची समजूत घालण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे अजित पवारांविरोधात शिवतारेंनी पुकारलेलं बंड आता थंड झाल्याचं स्पष्ट झालंय.