Dharashiv News :धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गाव, हे गाव सध्या जादूटोण्याच्या दहशतीखाली आहे. त्याचं झालं असं की, गावातील बचत गटातून एका महिलेनं लाखो रुपये उचलले. मात्र हे पैसे मागितल्यावर ही महिला गावक-यांना जादूटोण्याची भीती दाखवत असल्याचा आरोप होतोय. यामुळे गावकरी महिला पुरत्या धास्तावल्यात. घरांमध्ये लिंबू,राख, सुया टाकण्याचा प्रकारही समोर आलाय. आणि इतकंच काय तर ही महिला वंशाचा दिवा संपवण्याची धमकी देत असल्याचा आरोपही होतोय.
गावातील सीसीटीव्ही कॅमे-यात काही लोकं लिंबू राख सुया टाकत असल्याचं दिसून आलंय.. या गावक-यांची भीती घालवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती गावक-यांचं प्रबोधन करतेय. अशा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अंनिसने केलंय.
रात्रीच्या वेळी ही महिला आणि 2 पुरुष गावात फिरत असल्याचा दावा महिला ग्रामस्थांनी केलाय.या महिलेची तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचं गावक-यांचं म्हणणं आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेची पाळंमुळं रोवलेली दिसतात. गावक-यांच्या याच भीतीचा आधार घेत या महिलेनं पैसे हडपलेत.त्यामुळे अशाप्रकारे अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना गंडा घालणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.
धुळे जिल्ह्यात अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. स्मशानभूमीमध्ये अघोरींनी कोंबड्या बांधुन ठेवत, बोकडाची कत्तल केली. यावेळी लिंबू, कवड्यांचा खचही पाहायला मिळाला होता. दरम्यान याप्रकरणी अनिसने कारवाईची मागणी केली.
जादुटोना केल्याच्या संशयावरून एका 67 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात मौशी इथे ही घटना घडलीये. जादूटोणा करतो म्हणून या वृद्धाची लाथा बुक्क्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली.त्यातच वृद्धाचा मृत्यू झाला आहे.