अमित जोशी, मुंबई : सिद्धिविनायकाचं दर्शन घेत पूनम महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरला. उत्तर मध्य मुंबईची लढत दर निवडणुकीला रंगतदार होते. कारण इथला मतदार त्याचे पत्ते कधीच खुले करत नाही. उत्तर मुंबई मतदारसंघ हा मुंबईतला हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येथे दोन दिवंगत राजकीय नेत्यांच्या मुलींमध्ये सामना रंगणार आहे. पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त यांच्यात कांटे की टक्कर आहे. दोघींनाही एकेकदा इथल्या जनतेनं दिल्लीत जाण्याची संधी दिली आहे. आता २०१९ ची उत्सुकता असताना दोघींनीही विजयाचा दावा केला आहे.
उत्तर मध्य मतदारसंघात बॉलिवूड तारेतारकादळांची घरं, कुर्ला, कलीनामधल्या झोपडपट्ट्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात ५ लाख ७३ हजार मराठी मतदार, साडे तीन लाख मुस्लिम, अडीच लाख उत्तर भारतीय, गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तर ७३ हजार ३८७ ख्रिश्चन मतदार आहेत. २०१४ मध्ये पूनम महाजन जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्यानं निवडून आल्या होत्या.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघावर कुठल्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचा दबदबा नाही. त्यामुळे इथल्या मतदारांच्या मनात काय आहे हे २३ मे २०१९ लाच समजेल.