Piyush Goyal : भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी, 'या' कारणांनी गोपाळ शेट्टींचा पत्ता कट

अखेर पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सध्याचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

Updated: Mar 13, 2024, 08:56 PM IST
Piyush Goyal : भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी, 'या' कारणांनी गोपाळ शेट्टींचा पत्ता कट title=

Piyush Goyal, Mumbai North Lok Sabha constituency : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपकडून महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर रावेरहून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बीडमधून पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, नितीन गडकरी नागपूर, रावसाहेब दानवे जालन्यातून भाजपचा किल्ला लढवणार आहेत.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ योग्य ठरेल याबद्दल चाचपणीही सुरु होती. अखेर पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सध्याचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Big News : पंकजा मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे पाटील... महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

...म्हणून गोपाळ शेट्टी यांचा भाजपकडून पत्ता कट

मागील निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद उत्तर मुंबई मतदारसंघात झाली होती. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल 4 लाख 65 हजार 247 मतांनी धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे गोपाळ शेट्टी यांच्याइतकं मताधिक्क्य राज्यात अन्य कोणत्याही उमेदवाराला मिळालं नव्हतं. त्यामुळेच ही जागा भाजपसाठी मुंबईत सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. 

गोपाळ शेट्टी हे 2014 पासून उत्तर मुंबईचे खासदार आहेत. पण यंदा भाजपने त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा भाजपने राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभा लढवावी आणि त्यांच्या जागी राज्यसभेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असे ठरवलं आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर केली गेल्याचे बोललं जात आहे. 

भाजपचा सर्वात सुरक्षित बालेकिल्ला

उत्तर मुंबई मतदारसंघ भाजपचा सर्वात सुरक्षित बालेकिल्ला मानला जातो. उत्तर मुंबईत भाजपची चांगली ताकद आहे. या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. या सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत. तर उर्वरित दोन जागांपैकी एक जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि दुसरी काँग्रेसकडे आहे. 1989 ते 2004 या कालावधीत राम नाईक या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी सलग पाच निवडणुका जिंकल्या. 2004 मध्ये अभिनेता गोविंदा याने राम नाईक यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. तर 2009 मध्ये काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी अभिनेता गोविंदा यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. 2014 मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टींनी संजय निरुपम यांचा साडे चार लाखांनी धुव्वा उडवला. तर 2019 मध्ये शेट्टींनी ही जागा साडे चार लाखांपेक्षा अधिक मतांनी राखली. विशेष म्हणजे गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये शेट्टींनी 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेतली.

गोपाळ शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान पियुष गोयल हे केंद्रातील प्रभावी मंत्री मानले जातात. वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळेच गोयल यांना अत्यंत सुरक्षित अशा उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर केली गेली आहे. पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघांतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. अजून 2-3 दिवस आंदोलन करतील. आम्ही अशी आंदोलने पहिली आहेत. या कार्यकर्त्यांसोबत उत्तम पद्धतीने काम केलं आहे. निवडणूक जिंकलो आहे आणि त्यामुळे त्यांना अशाप्रकारचा धक्का लागणं स्वाभाविक आहे", असे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले.