मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. तर विरोधकही कर्जमाफीवरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. चार आठवडे चालणारे महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सीएए, एनपीआरच्या मुद्यांसह राज्यातील विविध मुद्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती विरोधी पक्ष भाजपने आखली आहे.
शेतकरी कर्जमाफी बरोबरच महिला अत्याचाराच्या वाढलेल्या घटना, फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा, सीएए आणि एनआरसी यावरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. एल्गार परिषदे चौकशीचा मुद्दा ही या अधिवेशनात उचलला जावू शकतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. ३ महिन्यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकार जनतेला किती दिलासा देणार हे या अर्थसंकल्पातून समोर येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावरुन महाविकासआघाडीमध्ये बिनसण्याची शक्यता आहे.