मुंबई : कोरोना व्हायरस संकटाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद स्वखर्चाने प्रवासी मजूरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी बसेसची व्यवस्था करत आहे. लॉकडाऊन झाल्यापासून सोनूने आतापर्यंत अनेक प्रवासी मजूरांना त्याच्या गावी सोडलं असून अजूनही तो हे काम सातत्याने करत आहे. सोनूच्या या कामाची अनेकांनी दखल घेतली असून अनेकांकडून त्यांचं कौतुकही होत आहे. आता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी, विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात सुरक्षित पोहचविण्यासाठी सातत्यपूर्वक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत सोनू सूदचं दूरध्वनीवरुन अभिनंदन केलं आहे.
Governor Bhagat Singh Koshyari called up actor, filmstar @SonuSood and complimented him for his dedicated work in facilitating the safe transportation of migrant people from various states to their home states.
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 27, 2020
राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीदेखील सोनूचं कौतुक केलं होतं. जयंत पाटील यांनी ट्विट करत, पडद्यावर खलनायकाचं काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करत असल्याचं ट्विट करत त्यांच कौतुक केलं होतं.
सोनूने आतापर्यंत मजुरांना कर्नाटक, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशसारख्या दूरच्या राज्यात सुखरुपपणे पोहचवलं आहे. कोरोना व्हायरच्या संकटात या आधीदेखील सोनूने मदत केली होती. कोरोना योद्धांना जुहू येतील हॉटेल राहण्यासाठी दिलं होतं. एवढंच नाही तर त्याने लॉकडाऊनमध्ये गरीब-गरजूंच्या मदतीसाठी अन्न वाटपही केलं होतं.
कोरोनाचं संकट, लॉकडाऊनमुळे अनेक मजूरांचे हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने मजूरांनी आपल्या गावची वाट धरली आहे. मिळेल त्या मार्गाने तर कधी पायीचं जाण्याचा मार्ग त्यांनी धरला आहे. या संकटाच्या काळात समाजातील या घटकाप्रती आपली जबाबदारी ओळखत सोनूने, स्वखर्चाने मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला असून हा रील खलनायक सर्वच जणांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहे.