मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वात आधी शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा अजून कोणताही विचार दिसत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लहान मुलांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांमध्ये अधिक दिसून आला आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शाळा उघडतात. पण यावर्षी तसं होईल असं वाटत नाही. स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे.
'मुलांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असल्यानं पहिली प्राथमिकता त्याला असेल. शिक्षक, अधिकारी यांच्याशी यासंदर्बात बोलणं झालं आहे. पालकांशीही मी बोलणार आहे, त्यांना विश्वास आल्याशिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार नाही. कोरोनामुळं प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, त्यानुसार निर्णय घेतले जातील.' असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग डिजिटली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल का याबाबत विचार करत आहे. प्रत्यक्षात शाळा जरी सुरु झाल्या नाही तरी 15 जून पासून डिजिटलच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.
सध्याच्या परिस्थितीत शाळा कशा आणि कधी सुरु होणार याबाबत पालकांना प्रश्न आहे. त्यातच लॉकडाऊन पुन्हा वाढलं तर शाळा सुरु होणं आणखी कठीण आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय़ घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.