मुंबई : Corona कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या ४२वर पोहोचल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या. कोरोनाविषयीची सविस्तर माहिती सांगताना त्यांनी या विषाणूच्या संसर्गाविषयीच्या चाचणीबाबतची महत्त्वाची माहिती देत आतापर्यंत ८०० चाचण्या झाल्याचं सांगितलं.
कोरोनाची लक्षणं दिसल्या आणि परदेशी प्रवास केलेला असल्यासच कोरोनाची चाचणी केली जात आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणतीही लक्षणं दिसल्यास चाचणी केली जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकांच्या चाचण्या झाल्याचं सांगत यापुढे चाचण्या सुरु राहतील. पण, तूर्तास नागरिकांनी सतर्कता राखणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी कोरोना संशयित आणि एखादा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाशी दुजाभाव न करण्याचा इशारा दिला आहे. 'रुग्णांशी, संशयितांशी दुजाभाव करुन नका हे माणुसकीच्या विरोधात आहे. हा आजार बरा होणारा आहे त्यामुळे भयभीत होण्याचं कारण नाही. त्यामुळे रुग्णांना आणि संशयितांना कुटुंब आणि शेजाऱ्यांनी मदत करा. या संसर्गामधून सावरणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे ही बाबही लक्षात घ्या', असं ते म्हणाले.
चीनमध्येसुद्धा कोरोनातून सावरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची सकारात्मक बाब पुढे आणत त्यांनी व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसवर मात करतेच आणि आपण त्यातून बाहेर पडतोचय पण, शिस्त पाळण आणि योग्य उपचार घेणं गरजेचंच असल्याचा सूर त्यांनी आळवला. आपण, समाजाचं देणं लादतो या भावनेनं सर्वांनी परिस्थितीला सामोरं जाण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
परिस्थितीचं गांभीर्य पाहता नोकरदार वर्गाविषयीही महत्त्वाचे निर्णय
अत्यावश्यक सेवा बंद करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खासगी क्षेत्रांमध्ये काम करणारे व्यावसायिक, उद्योजक यांना वर्क घरुनच काम करण्याची आणि गरज पडल्यास कार्यालयाचून ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच काम करण्याची विचारणा करण्यात आली आहे असं टोपेंनी सांगितलं. सरकारी कार्यालयांमध्येही ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम व्हावं असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.