Maharashtra Monsoon Assembly Session : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मन हेलावून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली होती. एका आईला आपल्या दोन तान्हुल्यांना डोळ्यासमोर प्राण सोडताना पाहावं लागलं. केवळ आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्यानं एका गर्भवती महिलेच्या जुळ्या मुलांचा दुदैवी मृत्यू झाला होता. पालघरमध्ये ही दुर्देवी घटना घडली होती.
अजित पवारांचे सरकारला खडेबोल
झी 24 तासने ही बातमी दाखवली होती. या बातमीचे आज विधानसभेत पडसाद उमटले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. बालकांच्या मृत्यूची घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आदिवासी भागात रस्त्यांची दुरवस्था असून याठिकाणी रस्ते कधी होणार? दुर्देवाचं दुष्टचक्र कधी थांबणार? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे, त्याच ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात बिकट अवस्था आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना राज्यातील एका आदिवासी पाड्यावर ही दुर्देवी घटना घडली आहे. आदिवासी पाड्यातील एका भगिनीची घरीच प्रसूती झाली,तिला एक मुलगा आणि मुलगी अशी जुळी अपत्य झाली. पण आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्देवाने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नाही, अॅम्ब्युलन्स येऊ शकत नाही, हे किती दिवस चालणार असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री शिंदे यांचं उत्तर
अजित पवार यांनी विधानसभेत पालघरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं. आदिवासी भागात तातडीने सुविधा देण्यात येतील, आदिवासी महिला आणि बालकांच्या मृत्यूच्या घटना पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्ममंत्र्यांनी दिलं.
आदिवासी भागात रस्त्यांची दूरवस्था आणि पूल यांचा सर्वंकष विचार करुन तातडीने उपाययोजना केल्या जातील, यापुढे कोणत्याही आदिवासी भगिनीचा किंवा बालकाचा मृत्यू होणार नाही, ही बाब शासन नक्की गांभीर्याने घेईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.