मुंबई : निम्मा महाराष्ट्र मान्सूननं (Maharashtra Monsoon Update) व्यापला आहे. मात्र जून महिन्यातले पहिले 15 दिवस हे पावसाविनाच गेले. राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये 50 ते 80 टक्क्यांनी कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणांनीही तळ गाठला. दरम्यान अशी विदारक परिस्थिती असताना मान्सूनबाबत आनंदाची बातमी आहे. (maharashtra monsoon update 2022 rain is expected to be active in state from June 18)
राज्यात 18 जूनपासून मान्सून सक्रीय होण्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेत राज्यातील विविध भागात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. येत्या 18 तारखेपर्यंत विदर्भातील उर्वरीत भागातही मान्सून दाखल होईल. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाउस पडेल, असं भाकित हवामान खात्याने वर्तवलं आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, वैभववाडीमध्ये दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काही भागात ऊन तर काही भागात दमट वातावरण आहे. कणकवली तालुक्यात अर्धातास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. चार दिवसाच्या विश्रांतीनंतर कणकवलीत आलेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. मात्र पेरणीसाठी अजून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.