मुंबई : शिवसेनेत झालेल्या हे बंडामुळे दुसऱ्या एका घटनेची अनेकांना आठवण झाली. दुसऱ्या एका राज्यात अशीच मोठी बंडखोरी होऊन सत्तांतर झालं होतं. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये काय साम्य आहे, बघुयात. (maharashtra political crisis tdp chandrababu insurrection in 1995 at andhra pradesh)
शिवसेनेमध्ये झालेलं आजवरचं सर्वात मोठं बंड महाराष्ट्रानं पाहिलं. 1995 साली एका वेगळ्या राज्यात असंच काहीसं घडलं होतं. ते राज्य होतं आंध्र प्रदेश. पक्ष होता तेलगू देसम. आणि बंडखोरांचे नेते होते चंद्राबाबू. TDP आणि शिवसेनेतील बंडात अनेक साम्य आहेत.
तेलगू देसमचे संस्थापक एन टी रामाराव यांच्याविरोधात त्यांचे जावई एन चंद्राबाबू नायडू यांनी 1995 साली बंडाचा झेंडा फडकवला होता तो रामाराव यांची वयानं निम्मी पत्नी लक्ष्मीपार्वती यांच्यामुळे. लक्ष्मीपार्वतींनी रामाराव यांचा आमदार अन् कार्यकर्त्यांशी संपर्क पूर्ण तोडला. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं चंद्राबाबूही याला अपवाद नव्हते.
टीडीपीच्या 20 आमदारांनी 23 ऑगस्टला चंद्राबाबूंकडे कैफियत मांडली. त्यानंतर चंद्राबाबू गटातल्या तीन आमदारांनी रामाराव यांची भेट घेऊन लक्ष्मीपार्वतींना पक्षापासून दूर ठेवण्याची विनंती केली. ती अर्थातच धुडकावण्यात आली.
आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं दिसताच रामराव यांचे पुत्र नंदमुरी हरीकृष्ण आणि बालकृष्ण यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेरचा प्रयत्न म्हणून स्वतः चंद्राबाबूंनी रामाराव यांच्याशी 3 तास चर्चा केली. याचा कुठलाच परिणाम झाला नाही. अखेर चंद्राबाबूंनी बंडाचं हत्यार उपसलं.
चंद्राबाबूंच्या पाठीशी तब्बल 140 आमदार उभे राहिले. अखेर 31 ऑगस्टला रामराव मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. आणि दुस-याच दिवशी 1 सप्टेंबर 1995 ला चंद्राबाबूंचा शपथविधी झाला.
अर्थात चंद्राबाबूंनी जेव्हा बंड केलं तेव्हा एका फटक्यात सरकार आणि पक्ष त्यांच्या ताब्यात गेला होता. महाराष्ट्रात असं घडलेलं नाही. तेलगू देसममधल्या या घडामोडी ऑगस्ट बंड म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर त्या आंध्र प्रदेशचंही विभाजन झालं, तेलगू देसमची सत्ताही गेली. मात्र शिवसेनेतल्या फुटीमुळे 27 वर्षांपूर्वीच्या टीडीपीच्या इतिहासावरील धूळ झटकली गेलीये, हे मात्र खरं.