Maharashtra Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचा सुधारित अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मागण्या मान्य झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार मिळतीलस असे म्हटलं आहे.
"देशाचंच नव्हे, तर जगाचं लक्ष सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडं लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली. अतिशय संयमीपणे, शिस्तीनं हे आंदोलन केलं. आंदोलन करताना इतर समाजाला त्रास होऊ दिला नाही. मराठा समाजानं अनेकांना मोठं केलं. मोठी-मोठी पदं मिळवून दिली. मात्र, पदं मिळाली तेव्हा समाजाला न्याय देण्याची संधी त्यांनी घालवली. आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे. मतासाठी नाही, हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय सरकारनं घेतले आहेत. हा ऐतिहासिक दिवस आहे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. एक सर्वसामान्य माणूस ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्याच्या मागे लोक उभे राहिले. असं ज्यावेळी होतं, त्यावेळी त्यात एक वेगळेपण असतं," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. बाळासाहेबांची जयंती नुकतीच झाली. या दोघांचे आशीर्वाद आणि सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती व अधिकार दिले जातील. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आर्थिक मदत दिली आहेच, पण नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत. सरकार पूर्ण गंभीर आहे. मंत्रिमंडळाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
"एक मराठा लाख मराठा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचं अभिनंदन करतो," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंचे कौतुक केलं.