Republic Day 2025 : देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणजे असंख्य भारतीयांसाठी आणखी एक अभिमानाचा दिवस. हा तोच दिवस जेव्हा भारत देश जगभरात प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाला. देशभरात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर लष्कराच्या भव्य पथसंचलनाचं आयोजनही करण्यात येतं. जिथं भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांचा उत्फूर्त सहभाग पाहायला मिळतो.
सलामी मंचावरील मान्यवरांना सलामी देत हे पथसंचलन पुढे जातं. अनेक शालेय विद्यार्थ्यांपासून देशविदेशातील आमंत्रितांची या सोहळ्यामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. 26 जानेवारी हा दिवस, एका सुवर्णक्षणाची आठवण आहे. जेव्हा 1950 मध्ये याच दिवशी भारतीय संविधान लागू करण्यात आलं होतं. हे तेच संविधान आहे, ज्यामुळं भारत एक स्वयंपूर्ण, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून देशाला विशेष दर्जा मिळवून देतं. हा तोच दिवस आहे, जो कायमच एक नागरिक म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्यांप्रती जागरुकता अबाधित ठेवतो.
प्रजासत्ताक दिन देशभरात दरवर्षी साजरा केला जातो. पण, यंदा नेमका कितवा प्रजासत्ताक दिन? हा प्रश्न मात्र सातत्यानं अनेकांच्या मनात घर करत असतो. काय आहे या प्रश्नाचं उत्तर?
26 जानेवारी 1950 रोजी भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. ज्यामुळं 2025 मध्ये भारत देश 26 जानेवारी या दिवशी देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, कारण 1950 पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली होती. अनेकांचाच असा समज आहे की, 1947 मध्येच भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र ठरला गोता. पण, तसं नसून 1950 या वर्षात देश प्रजासत्ताक ठरला होता.
15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र झाला होता. पण, तेव्हा मात्र हा देश प्रजासत्ताक राष्ट्र नसून एक राष्ट्रमंडळ देश होता. देशाच्या संविधान निर्मितीसाठी साधारण अडीच वर्षांचा काळावधी लागला. अखेर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं आणि देशाला प्रजासत्ताक हा दर्जा मिळाला. ज्यामुळं 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.