दीपक भातुसे / मुंबई : आमच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते वगळायचे ते ठरवावे लागेल. त्यानंतर किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचे हे ठरावावे लागणार आहे. त्यानंतर सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करताना भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप-शिवसेना युतीत सत्तेतील वाटा यावरुन संघर्ष विकोपाला गेल्यानंतर शिवसेनेने काडीमोड घेतला. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला विचारणा केली. त्यानंतर त्यांना २४ तासांची मुदत दिली. मात्र, पाठिंब्यासाठीची पत्रे शिवसेना सादर करु न शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीने मुदत वाढीची मागणी केली. तीही राज्यपालांनी दिली नाही. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा प्रस्ताव दिल्लीत पाठवला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या प्रस्तावर स्वाक्षरी केली. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
त्यानंतर शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सत्तास्थापन करण्यासाठी बोलणी सुरु झालीत. शिवसेनेने अधिकृत प्रस्तावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसपुढे मांडला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. तर काँग्रेसचे नेते शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यापार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत, शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आला तेव्हा पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत व्यापक चर्चा केली. मात्र जोपर्यंत शिवसेना एनडीएचा घटक होता तोपर्यंत चर्चा करणे शक्य नव्हते. मात्र, शिवसेना एनडीएमधूनबाहेर पडल्यानंतर याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली. आमदारांशी चर्चा केली आणि ते सोनिया गांधी यांना कळवले. सोनिया गांधींनी त्यानंतर आम्हाला दिल्लीत बोलवले आणि चर्चा केली. आम्ही आमची मते मांडली.
दरम्यान, सोनिया गांधींनी फोनवरही चर्चा केली. शरद पवारांनीही उद्धव ठाकरे याच्याशी औपचारिक चर्चा केली. पण पाठिंब्याची पत्र द्यायला तोपर्यंत उशीर झाला होता. पवारांनीही म्हटले की, आधी सर्व चर्चा करू आणि पुढे जाऊ. पवारांनी सोनियांना हा सल्ला दिला. त्यानंतर आम्हीही ठरवले पुढे कसे जायचं ते चर्चा करून ठरवू. अन्यथा सरकारमध्ये जाऊन नंतर चर्चा करणे शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसचा ढिसाळपणा, वेळ काढला, अशी टीका योग्य नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
सोनिया गांधींनी जेव्हा हिरवा कंदील दाखवला त्यानंतर औपचारिक चर्चा सुरू झाली आहे. पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. आधी याबाबत आमच्या पक्षात चर्चा करू, त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. त्यानंतर सत्ता वाटप सूत्र, पाठिंबा याबाबत नंतर चर्चा होईल. मुख्यमंत्रीपदाबाबत मी काही बोलणार नाही. सत्ता वाटपाच्या सूत्रात याबाबी चर्चेत येतील. कुठलीही आघाडी झाली. आमच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे कुठले वगळायचे ते ठरवावे लागेल. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचे हे ठरावावे लागणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.