मुंबई : महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक मुंबईमध्ये पार पडली. 'काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे', अशी मागणी या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असंही थोरात म्हणाले.
'राज्याचे काही प्रश्न घेऊन एकत्र चर्चा केली. चक्रीवादळ झालं त्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवर गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांसाठीही आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करणं अपेक्षित आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू,' अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते.
महाविकासआघाडीचं सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येणारे निर्णय तिन्ही पक्षांची चर्चा करून घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसतंय, त्यामुळे निर्णयांमध्ये सहभागी नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.
महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने, विधान परिषदेत एक जागा कमी मिळाल्यामुळे आणि आता निर्णय घेताना स्थान मिळत नसल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे. याआधीही निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची तक्रार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्षपदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती काँग्रेसकडे आहेत. तर गृह, आरोग्य ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. कोरोनावरील उपाययोजनांमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांचा काहीही सहभाग नाही. त्यामुळे काँग्रेस नेते आणि मंत्री नाराज आहेत. सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे.
याआधी काँग्रेस नेते राहुल गांधींनीही आम्ही महाराष्ट्रात सत्तेत असलो, तरी मोठे निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. हे म्हणत असताना राज्यातलं सरकार मजबूत आणि स्थिर असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला. सरकारमध्ये काँग्रेसचा योग्य सन्मान राखला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना दिलं.