महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, रातोरात नेत्यांकडून होणारं पक्षांतर पाहून ख्यातनाम सिने दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर अस्वस्थ झालेत. झी २४ तासच्या 'लीडर्स' कार्यक्रमात मुलाखत देताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील आताची राजकीय परिस्थिती हे अवाक करण्यास असल्याचं महेश मांजरेकर यावेळी म्हणाले.
महेश मांजरेकर म्हणतात की, मला काही कळतंच नाही... सध्या मी गोंधळेलो आहे. माझी स्वतःची अशी काही मतं आहेत. सुरुवातीला मला 'मनसे' ची विचारसरणी पटत होती. म्हणेच शिवसेनेचे जे मत होते तेच मत आधी मनसे होते आणि आता भाजपचीही तिच विचारसरणी आहे. पण आता मी हे सगळं पाहतो तेव्हा मला काही कळत नाही. नेमकं काय सुरु आहे?
पुढे मांजरेकर म्हणतात की,' राजकीय व्यक्ती एका रात्रीत आपली विचारसरणी कशी बदलू शकते. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पक्ष बदलला तेव्हा मला वाटलं की, पक्षात विचारसरणीवरुन वाद झाला असेल. पण सत्य परिस्थिती काही वेगळीच होती. आता जे सुरू आहे ते विचारांच्या पलिकडे आहे. एखादा राजकीय व्यक्ती जेव्हा आपलं मत मांडत असतो तेव्हा तो इतका एकनिष्ठ वाटत असतो. पण जेव्हा तो पक्ष बदलतो तेव्हा आपण कशावर विश्वास ठेवायचा? हा प्रश्न महेश मांजरेकरांना पडतो.
मी माझी तत्त्व फार बदलणार नाही, असं महेश मांजरेकर म्हणतात. आता राजकारणात येण्याची योग्य वेळ आहे, असं देखील महेश मांजरेकर म्हणाले. कुणीतरी आता राजकीय पक्ष काढायला हवं असं देखील महेश मांजरेकरांना वाटतं. महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर महेश मांजरेकरांनी 'लीडर्स' या कार्यक्रमात आपली मतं मांडली.
'ही अनोखी गाठ' हा नवा कोरा सिनेमा घेऊन दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात एक नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री गौरी इंगवले ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. हा सिनेमा 1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.