शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करा; साहित्यिकांचे आंदोलन

या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक सहभागी झाले होते.

Updated: Jun 24, 2019, 11:32 PM IST
शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करा; साहित्यिकांचे आंदोलन title=

मुंबई: सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, या मागणीसाठी सोमवारी आझाद मैदानात साहित्यिकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक सहभागी झाले होते. आंदोलन करणार्‍या साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली.

या भेटीनंतर सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये १२ वी पर्यंत  मराठी भाषा सक्ती करण्यासाठी वटहुकूम काढणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांना दिले. 

मराठी भाषा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मराठी भाषा प्राधिकरणही असणार आहे. सांस्कृतिक आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनीही सरकार मराठी भाषेसाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु असून मुंबईत मराठी भाषा भवनही उभारले जाणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिले. 

आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात राज्यातील २४ साहित्य संस्था, मराठीप्रेमी, शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या. सर्व शिक्षण मंडळांच्या अमराठी शाळांमध्ये मराठी बंधनकारक करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केल्यानंतर यासंदर्भातील कायदा याच अधिवेशनात व्हावा, अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात आली आहे.