अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : भायखळा जेलमधील महिला कैदी मंजूला शेट्ये हिच्या हत्ये प्रकरणात आरोपी जेल अधिक्षक मनीषा पोखरकरसह सहा आरोपींना जेल पोलीस, मुंबई पोलीस, मुंबई क्राईम ब्रांच यांच्यानंतर आता सरकारदेखील पाठिशी घालतय का? असा आता प्रश्न निर्माण झालाय.
या प्रकरणातील आरोपीला मदत केल्याप्रकरणी आणि खोटा अहवाल सादर केल्याप्रकरणी विधानसभेत विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भायखळा जेलचे वरीष्ठ अधिकारी तानाजी घरबुडवे आणि चंद्रमणी इंदुलकर यांना निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी विधानभवनात राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादळी चर्चेनंतर या दोघांना निलंबित केले गेले होते.
पण, त्यानंतरही चंद्रमणी इंदुलकर आणि तानाजी घरबुडवे हे दोघेही गेली तीन दिवस म्हणजे बुधवार, गुरुवार आणि आजचा दिवस शुक्रवारी कामावर भायखळा जेलमध्ये येत आहेत. त्यामुळे नेमकं या दोघांचे निलंबन झाले होते का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय.
याबाबत, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी जेलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी देखील घरबुडवे आणि इंदुलकर हे दोघेही कामावर असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय. या सोबतच तानाजी घरबुडवे आणि चंद्रमणी इंदूलकर यांचे निलंबन सभागृहात झालंय तसा शासकीय आदेश आम्हाला प्राप्त झाला नाही... त्यामुळे घरबुडवे आणि इंदूलकर दोघेही कामावर रुजू आहेत आणि आजचा दिवस पकडून गेली तीन दिवस ते कामावर येत आहेत या बातमीला देखील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय.
त्यामुळे सभागृहात सरकारने घरबुडवे आणि इंदूलकर यांच्या निलंबनाची जी घोषणा केली होती. ती फक्त घोषणाच होती का? अशा आता चर्चा सुरु झालीय.