मुंबईला गोवरच्या साथीचा विळखा, 7 संशयित मृत्यू... 6 मुलं ऑक्सिजनवर

मुंबई महापालिकेची धावाधाव, लसीकरण वाढवण्याच्या सूचना, विरोधकांची टीका

Updated: Nov 15, 2022, 06:10 PM IST
मुंबईला गोवरच्या साथीचा विळखा, 7 संशयित मृत्यू... 6 मुलं ऑक्सिजनवर title=
प्रतिकात्मक फोटो

Measles Outbreak in Mumbai : मुंबईत गोवरचा उद्रेक झालाय. मुंबईत (Mumbai) आतापर्यंत गोवरमुळे (Measles) 7 संशयितांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. मुंबईत जानेवारी पासून गोवरचे 142 गोवरचे आढळले आहेत. तर सद्यस्थितीत 61 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईची आरोग्य यंत्रणा (Health Department) अलर्ट मोडवर (Alert Mode) आलीय. कोरोना काळात अनेकांनी मुलांना गोवरची लस दिली नाही. लसीकरणाकडे (Vaccination) टाळाटाळ केल्यामुळेच गोवरचा प्रसार वाढताना दिसतोय. 

एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू
गोवरनं एका वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corportion) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) मोहम्मद हसन नावाच्या बाळाचा गोवरमुळं मृत्यू झाला. पायधुनी भागात राहणाऱ्या या बाळावर गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र सोमवारी दुपारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे गोवरची लस दिलेली असतानाही हे बाळ दगावलं.

मुंबईला गोवरचा विळखा
पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 908 मुल गोवरचे संशयित रूग्ण आहेत. ताप आणि पुरळ अशी गोवरची लक्षणं आहेत. सध्या 61 गोवरग्रस्त रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 6 मुलांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय. गोवरचा मुकाबला करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याची टीका विरोधकांनी केलीय...

विरोधकांच्या टीकेनंतर मुंबई महापालिकेची धावाधाव सुरू झालीय. पालकमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावून लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या.

कशी घ्याल मुलांची काळजी?
गोवर संरक्षणासाठी लहान मुलांना लसीचे 2 डोस द्या
ताप, खोकला, सर्दी, लाल डोळे अशी गोवरची लक्षणे आहेत
मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसल्यास तातडीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करा
गोवरग्रस्त मुलांना इतर लहान मुलांपासून दूर ठेवा
पाणी आणि फळांचा रस पिण्यास द्या, असा सल्ला डॉक्टर देतात

आपल्या मुलांची काळजी घेणं ही प्रामुख्यानं पालकांची जबाबदारी आहे.  तुम्ही नीट लक्ष दिलंत तरच गोवरच्या या साथीला आळा घालणं शक्य होईल.