मुंबई : MHADA House News : आता सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे. भिवंडीत (Bhiwandi ) म्हाडा 20 हजार घरं बांधणार आहे. ( MHADA House) याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तशी घोषणा केली आहे. सर्व उत्पन्न गटांसाठी भिवंडीत घरे म्हाडाच्यावतीने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाची भिवंडीसाठी बंपर लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे. याबाबत गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी ट्विट केले आहे. (MHADA to build 20,000 houses in Bhiwandi)
ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरे आहेत. भिवंडी पालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करेल, असे आव्हाड यांनी सांगितले. ही घरे आर्थिकदृष्ट्या मागास, गरीब, मध्यमवर्गीयांच्या घरांच्या सुविधेसाठी म्हाडाकडून भिवंडीमध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासह विकास कामांना गती देण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी महानगरपालिकेला भेट दिली.
महापालिका स्थायी समिती सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्री आव्हाड यांच्यासह महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख, कोणार्क विकास आघाडी गटनेता विलास पाटील, उपमहापौर इम्रान खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शोएब खान गुड्डू आणि प्रमुख नेत्यांसह स्थायी नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने धोकादायक आणि अनधिकृत इमारती उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात अशा इमारती कोसळून दुर्घटना घडत असतात. या दुर्घटना टाळण्यासाठी पाऊल उचलण्याबाबत निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री आव्हाड यांनी आगामी काळात भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे.