सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाचा महत्वाचा निर्णय

Mill workers: म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात येणार आहे. राज्यातील गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील मंडळातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 14, 2023, 01:51 PM IST
सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाचा महत्वाचा निर्णय title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात येणार आहे. राज्यातील गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील मंडळातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. 

21 ऑगस्ट 2023 रोजी गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भातील बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे निर्देश दिले होते. राज्याच्या एकंदरीत जडणघडणीत महत्वाचा भाग असलेल्या गिरणी कामगार/त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळवून देऊन जीवनमानाचा दर्जा उंचावणेकरिता शासन कटिबद्ध असल्याने मंडळाकडे प्राप्त अर्जांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले होते. या निर्देशानुसार गिरणी कामगार पात्रता निश्चितीचे विशेष अभियान वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील पहिला मजला, कक्ष क्रमांक २४०, पणन कक्ष येथे आयोजीत करण्यात येत आहे. 
   
गिरणी कामगार/  वारसांनी म्हाडा मुख्यालयात येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त, मंडळातर्फे तयार करण्यात आलेले म्हाडाचे अधिकृत वेबसाईट www.millworkereligibility.mhada.gov.com वर  कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. 

कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक अर्जदारांपर्यंत पोहोचण्याकरिता व गिरणी कामगार/  वारसांच्या सोयीकरिता मंडळातर्फे एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली (IHLMS 2.0) या संगणकीय आज्ञावलीच्या सहाय्याने गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेकरिता स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. हे ॲप अर्जदार आपल्या भ्रमणध्वनीवर डाउनलोड करू शकतील. ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये mill workers eligibility या नावाने उपलब्ध आहे. या माध्यमातून गिरणी कामगार/  वारस अर्जदार कधीही आणि कुठूनही आपली कागदपत्रे संगणकीय प्रणालीत सादर करू शकतील.
   
या विशेष मोहिमेदरम्यान जमा झालेली कागदपत्रे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गिरणी कामगार/  वारसांच्या पात्रतेकरिता पाठविण्यात येणार आहेत व यामुळे गिरणी कामगार/  वारसांची पात्रता लवकरात लवकर निश्चित होणार आहे. ॲप वापरतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मंडळातर्फे कॉल सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहे. गिरणी कामगार / वारस यांना 9711194191 या मोबाइल क्रमांकावरही माहिती मिळणार आहे.   
 
 मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी   क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश , भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे.  सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.