Saif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'

Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 16, 2025, 12:28 PM IST
Saif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..' title=
आव्हाड यांची पोस्ट चर्चेत (फाइल फोटो)

Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला (Saif ali Khan)झाल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या हायप्रोफाइल व्यक्तीवर रात्री चाकू हल्ला होतोच कसा? असा सवाल विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच आता या विषयावरुन राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा हल्ला पूर्वी नियोजित असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी या प्रकरणावरुन सोशल मीडियावर आपल्या मनातील शंका बोलू दाखवली आहे.

"गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान..."

आव्हाड यांनी सैफ अली खानचा एक फोटो पोस्ट करत सदर हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं म्हणताना मागील काही काळापासून या अभिनेत्याच्या त्याच्या मुलाच्या नावावरुन अनेकदा लक्ष्य केलं जात होतं असंही म्हटलं आहे. "सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो," अशी पहिलीच ओळ जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिली आहे. "गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव 'तैमुर' ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे," अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. 

"वार करण्याची पद्धत बघता...."

आपल्या मागणीचा पाठपुरावा करताना आव्हाडांनी पुढे, "कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे," असंही म्हटलं आहे.

नक्की पाहा >> येरझऱ्या घालणारी करिना, रिक्षा अन्... Saif Ali Khan वरील Attack नंतरचा पहिला Video

पोस्टच्या शेवटी आव्हाड यांनी, "सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे, हे विशेष!" असं म्हणत सुरक्षेकडे इशारा केला आहे. तसेच पोस्टच्या शेवटी आव्हाडा यांनी, "विष रंग दाखवतयं का" असा हॅशटॅगही आव्हाड यांनी वापरला आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेचाही हल्लाबोल

दरम्यान, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी यांनीही थेट सरकारवर निशाणा साधला आहे. "सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. ही घटना मागील काही दिवसांपासून घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारानंतरची आहे. पूर्वीच्या या हल्ल्यांमध्ये मुंबईमधील मोठ्या नावांना मुद्दाम लक्ष्य करण्यात आलं आहे," असं म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी प्रशासनाबरोबरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

नक्की वाचा >> Saif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत...; पोलिसांचं म्हणणं काय?

"बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. बाबा सिद्दीकींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. आता सैफ अली खानवर हल्ला झाला," असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. "हे सारं वांद्र्यात घडलं आहे जिथे सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात. या अशा परिसरामध्ये पुरेश्या प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे," असा उल्लेखही प्रियंका चतुर्वेदींनी केलं आहे. "मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर मग कोण सुरक्षित आहे?" असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला आहे.