मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी', शंभूराज देसाईंनी गोगावलेंना दिलेल्या 'त्या' पुडीत काय?

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज अनेक मुद्यांवर विधीमंडळात चर्चा झाली, पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री शंभूराज देसाई यांनी भरत गोगावलेंना एक पुडी दिली. त्या पुडीत काय होतं याची चर्चा झाली आहे. 

Updated: Mar 24, 2023, 08:52 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी', शंभूराज देसाईंनी गोगावलेंना दिलेल्या 'त्या' पुडीत काय? title=

Maharashtra Budget Session :  विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) हा शेवटचा आठवडा सुरु आहे. उद्या म्हणजे 25 मार्चला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनात अवकाळी पाऊस, वाढती महागाई, कायद्या-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहिला मिळाले. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्याचे पडसाद विधीमंडळातही उमटले. विरोधकांनी विधासभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी'
विधीमंडळात या सर्व घडामोडी सुरु असताना एका वेगळ्याच विषयाची चर्चा अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही रंगली होती. एक वेगळचं दृश्य अधिवेशनात पाहिला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) भाषण सुरू असताना उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मागच्या बाकावर बसलेल्या भरत गोगावलेंना (Bharat Gogawale) एक पुडी दिली. शंभूराज देसाईंनी स्वतःच्या खिशातून काढून ही 'पुडी' दिली. भरत गोगावलेंनी ती 'पुडी' घेतली, पण ही दृश्य कॅमेरात कैद झाली आणि माध्यमांमध्ये झळकली.

शंभूराज देसाई यांनी दिलेली ही पुडी नेमकी कशाची यावरुन आता चर्चा सुरू झालीय. आणि विशेष म्हणजे आपण गोगावलेंना काय दिलं, हे आपल्यालाही माहीत नाही, अशी प्रतिक्रिया देसाईंनी दिलीय. खिशातला एखादा कागद गोगावले यांना दिला असेल, ते मी बघतो पण नियम मोडणारं कोणतंही कृत्य माझ्याकडून झालं नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. 

आदित्य ठाकरेंनी केली टीका
हा निंदनीय प्रकार असल्याची प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. हाऊसमध्ये जी प्रथा परंपरा आहे, जे नियम आहेत त्याचं कोणतंही पालन होत नाहीए, असे जर आपले राज्यकर्ते वागायला लागले, तर हे आदर्श राज्यकर्ते कसे होणार म्हणून आजच्या प्रकारावर कारवाई होणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच विधानसभेत मोठा गोंधळ झाला. या निर्णयाचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द यांच्यानिषेधार्थ काँग्रेस आमदार नेत्यांनी काळ्या पट्या लावत निषेध केला. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला.  

मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा
पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मोदींच्या नसानसात देशभक्ती आहे, आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यावर हजर होणाऱ्या पंतप्रधानांना तुम्ही चोर कसे म्हणू शकता?, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय