"काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर मनसेची टीका

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. आता मनसेने ही टोमणे सभा झाल्याची बोचरी टीका केली आहे.

Updated: Jun 9, 2022, 01:49 PM IST
"काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर मनसेची टीका title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी शिवसेनेकडून जंगी तयारी करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होणार असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. मात्र आता मनसेने ही टोमणे सभा झाल्याची बोचरी टीका केली आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेचा दुसरा अंक गोंधळलेल्या भाषणाने झाला. आम्हाला वाटलेलं टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरुन येईल. पण आम्ही चुकलो मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका वाटते. औरंगाबादचं संभाजीनगर होणार की नाही? याचं उत्तर शेवटपर्यंत मिळालं नाही. ते ना हिंदुंच्या विषयावर बोलले, ना विकासाच्या मुद्द्यावर बोलले. औरंगजेबाचं थडगं , भोंगा, नमाज याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ब्र देखील काढला नाही. औरंगाबादमध्ये तीन दशकांपासून शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, खासदार असूनही पाणी प्रश्न सोडवता आला नाही. एकाही प्रश्नावर मुख्यमंत्री स्पष्ट बोलू शकले नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे, हिंदू आणि मराठी जनता मारती खडे,  मुख्यमंत्र्यांची आजची सभा म्हणजे चला हवा येऊ द्याचा प्रयोग."

"औरंगजेबच्या कबरीवर डोक टेकवणाऱ्या ओवेसी विरोधात एकही शब्द न बोलणाऱ्या उद्धवजींनी दाखवुन दिले की, कालची सभा  "स्वाभिमान सभा" नसून स्वाभिमान गहाण सभा होती." अशी टीका मनसे प्रवक्ते योगेश चीले यांनी केली आहे.

मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्विट केलं आहे की, "इम्तियाज जलील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आधी विकास करून दाखवा मग मी स्वतः संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव देईल. मुख्यमंत्री हीच एमआयएमची भाषा बोलत होते. मी उद्धव ठाकरे शून्य आहे. नशीब स्वतःच बोलले.", उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील धागा पकडत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत बोचरी टीका केली आहे.