'त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही' अमित ठाकरेंचा इशारा

Amit Thackeray FB Post: मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ असल्याचे अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2024, 06:00 PM IST
'त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही' अमित ठाकरेंचा इशारा title=
अमित ठाकरे

Amit Thackeray FB Post: माहिम विधानसभा मतदार संघातून मनसे नेते अमित ठाकरे यांचा पराभव झाला. येथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत निवडून आले. दरम्यान निकालाला आठवडाही पूर्ण झाला नसलताना अमित ठाकरे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ड्रग्स सारख्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. यातील आरोपी अनिल गुप्ता हा ड्रग्सच्या नशेत होता. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंनी मुंबईला बसलेल्या ड्रग्सच्या विळख्याकडे लक्ष वेधले आहे. जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ असल्याचे अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 

अमित ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी 

'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे!

सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे.  मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे.
मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.  
सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे.  
जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची!

अमित ठाकरेंचा पराभव 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून दारूण पराभवाचा सामना करावा लागलाय.  शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना युबीटीकडून महेश सावंत हे दोन उमेदवार रिंगणात होते.  सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगेल, अशी चुरशीची लढत होईल,अशी अपेक्षा होती. मात्र, महेश सावंत यांनी बाजी मारत माहीमच्या मतदार संघातून विजय मिळवलाय. तर अमित ठाकरे हे तिस-या क्रमांकावर फेकले गेलेत. सदा सरवणकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र,सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यानं ही निवडणूक अमित ठाकरेंसाठी कठीण जाईल,अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यान हिंदू मतविभाजनाचा फटका अमित ठाकरे यांना बसलाय. तसेच सावंत यांना मुस्लिम मत मिळाल्यानं त्याचा विजय सुकर झाला.