मुंबई : 'भाजपची लोकं डोक्यावर पडली आहेत का?' असा सवाल विचारणार ट्विट संदीप देशपांडेंनी केलं आहे. भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला देऊन उद्घाटन केल्याचं चित्र समोर आलं आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी राज्याचा विरोधी पक्ष असलेल्या भाजप आमदारांवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईतील भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी 4 मार्च 2020 रोजी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी एका अद्ययावत शौचालयाचं उद्घाटन प्रसंगाचे फोटो शेअर केले आहे. या शौचालयाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे आणि यामुळेच भाजप नेत्यांवर मनसेने टीका केली आहे. ('जनाची नाही किमान मनाची तरी....' मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका)
'छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय केंद्र' असं या शौचालयाला नावं दिलं आहे. या उद्घाटन समारंभाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्तेच छत्रपती शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचे नमूद करण्यात आलं आहे. भाजपा आमदार आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळमकर आणि भाजपा नेते तमिल सेलवन हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या नावावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,'ही लोक डोक्यावर पडली आहेत का ?छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला?' या ट्विटमुळे भाजपवर जोरदार टीका सोशल मीडियातून देखील होत आबे.