मुंबई : ज्यांची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा पूर्वी दादर पश्चिम येथील राम मंदिरात जावून श्रीरामाची आरती केली. राज ठाकरे यांना "हिंदूजननायक" संबोधणारे आणि "आता सारे उठवू रान" अशा मजकुराचे संदेश असणारे टी-शर्ट आणि भगवी टोपी घालून मनसे पदाधिकारी आझाद मैदानात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासोबत मनसेच्या मंचावर प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या महापुरुषांसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही तसबीर लावण्यात आल्या आहेत.
शिवसेना नेतृत्वाचा आम्ही मान राखतो, त्यांनीही आमचा मान राखावा. परत काही बोलाल तर याद राखा असे आव्हान मनसे नेते अमेय खोपकर यांनी केले आहे. मोर्चाचा विषय हा देशाचा विषय आहे. आज देशाला भगवी लाट दिसणार असल्याचेही ते म्हणाले.
धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर जमले आहेत. त्यांनी 150 फुटी ध्वज सोबत आणला आहे. हिंदुजननायक राज ठाकरे असं त्यावर लिहिलंय. ठाण्यातूनही मनसे कार्यकर्ते मुंबईच्या ठिकाणी रवाना झाला आहे. एका ऐतिहासिक मोर्चाची ही सुरुवात आहे. मराठा मोर्चा सोडल्यास असा मोर्चा कधी निघाला नाही. हिंदु संस्थाचा सहभाग आजच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात असल्याचे ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.