मुंबई: महाराष्ट्रातील 'ठाकरे ब्रॅण्ड'ची ताकद कायम राखणे ही शिवसेनेइतकीच राज ठाकरे यांचीही जबाबदारी आहे, असे वक्तव्य करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी फटकारले आहे. आता कोंडीत सापडल्यानंतर तुम्हाला 'ठाकरे ब्रॅण्ड'ची आठवण आली का, असा सवाल त्यांनी राऊत यांना विचारला.
'मुंबई महाराष्ट्राच्या बापाची', सामनातून भाजप आणि कंगनावर टीका
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत आहे. कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर शिवसेनेने कंगनाला शिंगावर घेतले होते. मात्र, कंगना राणौतही शिवसेनेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. या सगळ्याला केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांकडून जोरदार समर्थन मिळत आहे. शिवसेनेविरोधातील प्रत्येक गोष्टीचे विरोधकांकडून भांडवल केले जात आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 13, 2020
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या सदरातून 'ठाकरे ब्रॅण्ड'चा हवाल देत राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे साद घालण्याचा प्रयत्न केला होता. 'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रॅण्ड आहे. हा ब्रॅण्ड नष्ट करून मुंबईवर ताबा मिळवायचा प्रयत्न सुरु आहे. राज ठाकरे हेसुद्ध त्याच ब्रॅण्डचा घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे ब्रॅण्ड'चा जोर असायला हवा, असे राऊत यांनी म्हटले होते.
यावरून अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांना चांगले फटकारले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. सगळीकडून कोंडी झाल्यानंतर तुम्हाला आता 'ठाकरे ब्रॅण्ड'ची चिंता वाटू लागली आहे. मात्र, ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे ब्रँण्डबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणारही नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका, असे खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.