Mumbai Car Rash Driving: पुण्यामध्ये पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे याची पुनरावृत्ती टळली आहे. पुण्यातील अपघातामध्ये एक दारुच्या नशेत धुंद असलेला एक अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. दरम्यान मुंबईच्या रस्त्यावरही असाच एक तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना निदर्शनास आला. कुठे घडला हा प्रकार? कोण होता हा तरुण? सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यातील घटना ताजी असताना मुंबई ओशिवरा परिसरातील अशीच एक घटना घडली. एक मुलगा दारू पिऊन सुसाट गाडी चालवत होता. त्याची गाडी इतक्या वेगाने होती की यात त्या गाडीचा पुढचा टायर फुटला होता. पण त्याची मुलाला अजिबात फिकीर नव्हती.
टायर फुटलेल्या परिस्थितीतही तो गाडी चालवत होता. त्याची भरधाव गाडी न्यू आदर्श लिंक रोडवरुन चालली होती. पोलिसांच्या निदर्शनास ही गाडी आली. पोलिसांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला पण तो अजून पळू लागला.
त्या ठिकाणी एक वॉचमन ड्युटीवर होता. पण मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने वॉचमनला धमकी दिली. पोलिसात जाऊ नकोस असा दम त्याने वॉचमनला भरला.
दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलाला ताब्यात घेतले. ज्या पद्धतीत तो गाडी चालवत होता ते पाहून लोक घाबरून पळू लागले होते. तो मुलगा आदर्श लिंक रोड वरून लोखंडवाला परिसरात पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती देण्यात आली आहे.