Mumbai Crime : मुंबईच्या (Mumbai News) मानखुर्द (Mankhurd Crime) परिसरात एका महिलेची गोळी घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन कुटुंबांमध्ये भांडण झाल्यानंतर 31 वर्षीय महिलेवर गोळीबार (Firing) करुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (Mumbai Poilce) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला असून यामध्ये आरोपीने महिलेवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत. तसेच आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबातील भांडणानंतर हा गोळीबार झाला. या गोळीबारात फरजाना इरफान शेख या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलेवर अत्यंत जवळून गोळ्या झाडण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने महिलेच्या छातीत गोळी झाडली होती. आरोपीने भांडण सुरु असतानाच महिलेवर गोळी झाडली. त्यानंतर लोक इकडून तिकडे पळू लागले. प्रत्यक्षात महिलेच्या हत्येवेळी आरोपी पिता-पुत्र एकत्र अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आणि 8 दिवसांपूर्वीच एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगितले, असे कुटुंबियांनी म्हटले आहे.
Mumbai| A woman, namely Farzana Irfan Sheikh died in firing in Mankhurd area. A scuffle broke out between 2 families & firing took place. CCTV footages being checked, efforts to arrest the accused underway: Mumbai Police
— ANI (@ANI) April 29, 2023
शनिवारी संध्याकाळी मानखुर्द येथील इंदिरा नगर मंडळ परिसरात दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान फरजानासोबत भांडणाऱ्या महिलेच्या पती आणि मुलाने तिच्यावर गोळीबार केला. त्यामुळे फरजाना इरफान शेखच्या छातीत गोळी लागली. या घटनेनंतर महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.35 च्या सुमारास ही घटना घडली. सोनू सिंग (55) आणि त्याचा मुलगा आतिस सिंग (25) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर गोळी झाडून दोघेही तेथून पळून गेले.
दरम्यान, पीडितेच्या महिलेच्या बहिणीवर हल्लेखोरांच्या गटाने आधी बलात्कार केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. अॅडव्होकेट सिद्दीक आसिफ हुसैन या ट्विटर युजरने यासंदर्भात ट्विट देखील केले होते. "मानखुर्दमध्ये २५ वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तिच्यावर तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. गंमत म्हणजे काही आठवड्यांपूर्वी तिच्या लहान बहिणीवर (अल्पवयीन) याच लोकांनी सामूहिक बलात्कार केला आणि मानखुर्द पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता," असे या ट्विटर युजरने म्हटलं आहे.
दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. "मानखुर्द भागात दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले. दरम्यान, महिलेचा पती आणि मुलाने गोळीबार केला. महिलेच्या मृत्यूप्रकरणी आम्ही दुसऱ्या कुटुंबातील दोन्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी दिली.