स्पेशल रिपोर्ट : कशी करावी मुलांची सायबर सुरक्षा?

सध्या समाजातील अनेक पालकांना भेडसावणा-या याच गंभीर प्रश्नासंदर्भात आज बालदिनाच्या निमित्तानं हा स्पेशल रिपोर्ट... 

Updated: Nov 14, 2017, 10:29 AM IST
स्पेशल रिपोर्ट : कशी करावी मुलांची सायबर सुरक्षा? title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : सध्या लहान मुलंही २४ तास संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोनवर खेळत असतात. अशावेळी लहान मुलांच्या सायबर सुरक्षेचा गंभीर प्रश्न पालकांसमोर उभा ठाकलाय. सध्या समाजातील अनेक पालकांना भेडसावणा-या याच गंभीर प्रश्नासंदर्भात आज बालदिनाच्या निमित्तानं हा स्पेशल रिपोर्ट... 

तळहाताच्या फोडाप्रमाणं पालक आपल्या मुलांना जपतात...पण आपली ही लहानगी मुलं आपल्याच हाताबाहेर कधी जातात आणि नको ते उद्योग करतात, हे पालकांना देखील कळत नाही. लहान मुलांना पालकांपासूनच नाही तर या विश्वापासून एका भ्रमित जगात नेणारा प्रकार म्हणजे इंटरनेट... या इंटरनेटचे जितके फायदे तितकेच तोटे देखील आहेत... ब्लू व्हेल गेम, डार्क नेट, थेफ्ट, री प्ले, सिली नाईटस् या ऑनलाइन गेम्सनी शेकडो मुलांचा जीव घेतलाय... अशा गेम्सपासून आपल्या मुलांना लांब कसं ठेवायचं आणि जर मुलं अशा गेम्सच्या आहारी गेली असतील तर पालकांनी काय केले पाहिजे, यासाठी पोलीस यंत्रणेनं काही उपाय सुचवलेत.

मुलांच्या ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हिटीवर लक्ष ठेवणे हीच सर्वात मोठी मुलांची ऑनलाईन सायबर सुरक्षा आहे...मुलांच्या ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्याकरता बाजारात अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ज्यांच्या वापराने मुलांच्या प्रत्येक ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हिटिची बारीक नजर ठेवली जाऊ शकते. पण, याही पेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे मुल आणि पालकांमधील संवाद, संवाद जितका जास्त तितकीच तुमची मुलं सर्वच बाबतीत सुरक्षित राहतील.