Mumbai News : मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून लहानग्यांवर ‘हँड-फूट-माउथ’चं सावट पाहायला मिळत आहे. लहानांचं आजारपण पाहून चिंतेत असणारे अनेकजण यातून सावरत नाहीत, तोच आता एका नव्या संकटानं डोकं वर काढलं असून, शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या विळख्यात येताना दिसत आहेत. हे संकट सणासुदीच्याच दिवसांमध्ये घोंगावत असल्यामुळं अनेकांचीच चिंता वाढली आहे.
सध्या पावसानं पाठ सोडली असली तरीही हवामानात असणारा अती उकाडा, अधूनमधून असणारं ढगाळ वातावरण आणि सोबतच असणारं प्रदूषण या साऱ्यांमुळं काही आजारांनी शहरात डोकं वर काढलं आहे. मध्येच तापमानात होणारी घट या परिस्थितीत आणखी भर टाकताना दिसत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सध्या ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, डिहायड्रेशन, श्वसनाचे आजार अशा आजारांनी डोकं वर काढलं असून, असे त्रास होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळत आहे.
शहरातील सद्यस्थिती पाहता प्रत्येकाने योग्य आहार घ्यावा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. याशिवाय पुरेशी झोप आणि व्यायाम या दैनंदिन सवयींमुळं सुदृढ जीवनशैली आत्मसात करून आजारपण दूर ठेवता येईल असाही सल्ला नागरिकांना दिला जात आहे. मान्सूननं माघार घेतल्या क्षणापासून मुंबईत तापमानवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ऑक्टोबर हिटनं अनेकांच्याच जीवाची काहिली केली. सोबतच शारीरिक व्याधीही बळावल्या. दरम्यान, या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी नागरिकांना काही सोपे उपायही बरीच मदत करून जाणार आहेत हे नाकारता येत नाही.