मुंबई : बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर भारताच्या हवाई दलाने कारवाई केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना देखील भारताला धमकी देत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. मुंबई देखील हायअलर्टवर आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन आटोपतं घेण्यात आलं आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी याची घोषणा केली. गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. विधानभवनात झालेल्या या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल उपस्थित होते. अधिवेशनामुळे विधीमंडळ परिसरात मोठी सुरक्षा यंत्रणा लागते. विधानभवन आणि आझाद मैदानात हजारो पोलीस व्यस्त असतात. हा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. विरोधी पक्षाने देखील याला एकमताने पाठिंबा दिला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. ज्यामध्ये ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती पुढे येत आहे. पाकिस्तान यामुळे बैचेन झाला आहे. एकीकडे शांतीची चर्चा आणि दुसरीकडे सीमेवर शस्त्रसंधींचं उल्लंघन अशी दुटप्पी भूमिका पाकिस्तानची दिसत आहे. पाकिस्तानमध्ये २ दिवसांपासून हालचाली सुरु आहेत.
भारताने देखील संपूर्ण तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री, गृहमंत्री सुरक्षेचा आढावा घेत आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव हायअलर्ट आहे. पोरंबदरमध्ये कोस्ट गार्डने भारतीय मच्छिमारांना देखील विशेष अलर्ट दिला आहे. समुद्रात जाऊ नये अशी सूचना मच्छिमारांना देण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दर २ तासाला मेट्रो आणि मेट्रोच्या परिसराची तपासणी होणार आहे. संशयित व्यक्ती दिसल्यास लगेचच पोलिसांना त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.