Mumbai Trans-Harbour Link Project : महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू पूर्ण बांधून झाला आहे. या मार्गाचे उद्या म्हणजेच 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. गेली अनेक वर्ष निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती, मात्र या नवीन मार्गावरुन वाहतुकीसाठी काही वाहनांना बंदी असणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू शिवडी येथून सुरु झाला आहे. हा मार्ग शिवडीहून थेट चिर्ले गावात म्हणजेच न्हावा शेवापर्यंत समुद्रमार्गे जातो. एकूण मार्ग 22 किमी आहे. त्यापैकी 16.80 किमी समुद्रमार्गे आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीता समुद्री पुल असून सध्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी छोटी कामे सुरू आहेत. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी आदर्श ठरेल.
भारतातील सर्वात लांब सागरी पूल असणाऱ्या तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सागरी सेतु म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक लवकरच सुरु होणार आहे. मात्र या पुलावरुन दुचाकी, ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षाला प्रवासास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच या मार्गावरुन प्रवास करतांना ताशी 100 किमी वेग मर्यादा पाळावी लागेल. हा पूल सहा पदरी असून 16.50 किलोमीटर मार्ग समुद्रातून तर 5.5 किलोमीटरचा भाग हा जमिनीवर आहे.
या पूलावरुन प्रवास करतांना कार, टॅक्सी, हलकी मोटार वाहन, मिनीबस आणि टू-एक्सल बसेसची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ताशी 100 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. पुलावर चढताना आणि उतरताना वेग 40 किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. अपघात रोखण्यासाठी भारतातील सर्वात लांब समुद्रमार्गे वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे.
- मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा देशातील अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा आदर्श उदाहरण आहे.
- 500 बोईंग विमाने आणि 17 आयफेल टॉवर्स एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.
- शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूची एकूण लांबी 22 किमी असून त्यापैकी 16.50 किमी भाग समुद्रात आणि 5.50 किमी जमिनीवर आहे.
- भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आणि जगातील 12 वा क्रमाकांवर असणारा सर्वात मोठा सागरी पूल. सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपये खर्च
- मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन्ही प्रसिद्ध बंदरांना जोडणारा सागरी सेतू.
- मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गातील अंतर सुमारे 15 किमीने कमी झाले आहे.
- महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षे लागली.