दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : नवदुर्गा हे नवी आव्हानं स्वीकारुन, त्यावर यशाचा झेंडा रोवणाऱ्या आधुनिक महिलांचं रुप... विविध क्षेत्रांत महिला उज्ज्वल कर्तृत्व गाजवतायत... आजपासून अशाच यशस्वी महिलांचा जागर आपण नवदुर्गामध्ये करणार आहोत..... आज ओळख नवदुर्गा निमिषा सिंगची...
सध्या सर्वच आव्हानात्मक क्षेत्रात महिला काम करताना दिसतात पण आजही असे काही विभाग आहेत जिथे महिलांची संख्या कमी आहे. असंच एक क्षेत्र म्हणजे सिव्हिल इंजिनिअरींग जिथे प्रत्यक्षात जागेवर जावून बांधकामाची पाहणी करावी लागते. नवदुर्गामध्ये आज आपण भेटणार आहोत मेट्रो 3 चे काम पाहणाऱ्या महिला सिव्हिल इंजिनिअरला...
जमिनीपासून कित्येक फूट खाली धडाडीनं काम करणारी ही निमिषा सिंग... २६ वर्षांची सिव्हिल इंजिनिअर... मुंबईत मेट्रो ३ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भुयारी काम निमिषा पाहते. महालक्ष्मीपासून वरळीपर्यंतच्या भुयारी मार्गाची जबाबदारी निमिशावर आहे.
मुंबईत सुरु असलेल्या मेट्रो तीनसाठी काम करणारी निमिशा ही एकमेव महिला सिव्हिल इंजिनिअर... भुयारी मार्गाचं काम वेळेत सुरु आहे का? सुरक्षित सुरु आहे का? आणि ठरल्याप्रमाणे होतंय का? हे पाहण्याचं काम निमिशा करते. त्यासाठी प्रत्यक्षात बांधकामाच्या ठिकाणी जावूनच निमिशाला या सगळ्याचा आढावा घ्यावा लागतो.
सिव्हिल इंजिनिअरींग ही शाखा सहसा मुली निवडतच नाहीत... कारण बांधकामाच्या जागेवर अर्थात साईटवर काम करणं हे थोडंसं आव्हानात्मक काम... पण निमिषानं हे आव्हान पेललं... त्यासाठी तिला संघर्षही करावा लागला. सुरुवातीच्या काळात महिला सिव्हिल इंजनिअर म्हणून निमिषावर विश्वास ठेवला जात नव्हता. इतकच काय तर काम पाहण्यासाठी तिला फिल्डवरही पाठवलं जात नव्हतं.
भुयारी मेट्रो 3 चा प्रकल्प मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा... मेट्रो तीनच्या भुयारामध्ये निमिषा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय... सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असली तरी निमिषा ही एक प्रेरणा आहे.