मुंबई : विधानपरिषदेत उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनीही प्रविण दरेकर यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी अजितदादा म्हणाले, 'दरेकर को गुस्सा क्यूं आता है'
विधानपरिषद सभागृहात कामकाज सुरु होते. यावेळी प्रविण दरेकर निलम गोऱ्हे यांच्यावर चिडलेत. निलम गोऱ्हे या आम्हाला बोलायला वेळ देत नाहीत. बोलण्यात व्यत्यय आणतात, असा प्रविण दरेकर यांनी आरोप केला. यामुळे आम्ही अविश्वास ठराव आणत होतो आणि परत आणूही शकतो, असा इशारा दिला.
यावेळी मला धमक्या देऊ नका, असे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी फटकारले. सभागृहात सुरु असलेल्या वक्तव्यांवरुन मी व्यथीत झालेय, मी सभापतींना निरोप देऊन बोलावून घेतले आहे. आता तुमचं चालु द्या, अशा शब्दात त्यांनी दरेकरांना उत्तर दिले.
राईट टु रिप्लायचे भाषण प्रविण दरेकर करत आहेत. यावेळी अजुन किती वेळ लागेल हे निलम गोऱ्हे यांनी विचारले असता प्रविण दरेकर चिडले. याआधीही बोलण्याच्या वेळेवरुन उपसभापती निलम गोऱ्हे आणि गोपिचंद पडळकर यांच्यात आज वाद झाला होता.
दरम्यान, विधान परिषदेत अजितदादांनी प्रविण दरेकर यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. दरेकर को गुस्सा क्यूं आता है, असं म्हणत दरेकरांना टोला लगावला. तर यावर दरेकर यांनीही खरपूस समाचार घेत अजितदादांना प्रत्युत्तर दिले. याचीच जोरदार चर्चा सुरु होती.