मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमिटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. आज या कमिटीची मुंबईत बैठक झाली.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणे यांची वर्णी लागली. आणि आता भाजपने नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने ही रणनिती आखली आहे. नितेश राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या आक्रमक शैलीचा भाजपाला फायदा होणार आहे.
या कमिटीत भाजपाच्या अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश असून मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, मनोज कोटक, प्रवक्ते संजय उपाध्याय या नेत्यांचा समावेश आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी या कोअर कमिटीच्या नेत्यांचा अनुभव भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.